शिक्षण विभाग पंचायत समिती बुलडाणाचे वतीने एमएमएमएस व सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न
बुलडाणा : एमएमएमएस व सारथी शिष्यवृत्ती परीक्षा २०२३-२४ या सत्रासाठी घेण्यात आल्या होत्य त्या परीक्षांतून शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालक तसेच शिक्षकांचा गौरव समारंभ शिक्षण विभाग, पंचायत समिती, बुलडाणा चे वतीने स्थानिक श्री शिवाजी विद्यालयात २९ एप्रिल रोजी घेण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या या सर्व जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना पुढील दिशा मिळावी व अभ्यासाची गोडी टिकून रहावी यासाठी या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आजचे विद्यार्थी हे भविष्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर घडतील तसेच समाजाच्या प्रगतीसाठी काम करतील. यासाठी शिक्षण विभागातील सर्व घटकांचे कार्य हे अतुलनिय आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधुन शिकून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांकडून हे काम घडेल असा विश्वास यावेळी विद्यार्थ्यांना संबोधीत करतांना बुलडाणा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पंढरी मोरे यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी शिकावे, मोठे व्हावे यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा सराव जिल्हा परिषद शाळांमधुन एमएमएमएस व सारथी सारख्या शिष्यवृत्ती परीक्षांतून घडून येतो. यामुळे मुलांना शैक्षणिक चालना तर मिळतेच परंतू शिक्षण घेतांना आर्थिक हातभारही मिळतो. यासाठी विद्यार्थ्यांनी कसोशिने प्रयत्न करून हे यश संपादन केले आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे यावेळी बोलतांना शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर मोरे यांनी म्हटले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पालकांनी तसेच शिक्षकांनी त्यांना घडविण्यासाठी प्रयत्नरत असावे असे प्रासंगिक बोलतांना शिक्षण विस्तार अधिकारी सौ. वंदना टाकळकर यांनी सांगितले. या कार्यक्रमात एनएमएमएस शिष्यवृती परीक्षेतील ११ गुणवंत व सारथी शिष्यवृती परीक्षेतील ३१ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यासोबतच त्यांचे पालक व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी सौ. वंदना टाकळकर, सौ. माधुरी मेमाने, मनोहर मोरे केंद्रप्रमुख पुरूषोत्तम सोनुने, विक्रम म्हस्के, सुरेश इंगळे, रामकृष्ण दांडगे, काशिनाथ शेळके, इलियास पठाण, रमेश यंगड, ज्ञानेश्वर वाघ, दिनकर सोनुने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन पठाण सर यांनी तर प्रास्ताविक पुरूषोत्तम सोनुने यांनी केले. उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे विक्रम म्हस्के यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व समग्र शिक्षा कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.