बुलडाणा : जनतेला विकास पाहिजे आणि आपण सुरूवातीपासूनच विकासाचे व्हिजन घेऊन लढतो आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा संदीप शेळके यांनी केला. अपक्ष उमेदवार तथा वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांचा जिल्हाभर झंझावाती प्रचार सुरू आहे. सामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळतोय. काल जामोद, संग्रामपूर, वरवट आणि सोनाळा येथे संदीप शेळके यांचा भव्य रोड शो संपन्न झाला. दरम्यान जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना संदीप शेळके म्हणाले की, ही निवडणूक परिवर्तन घडवून आणणारी आहे. जिल्ह्याचे भवितव्य घडवणारी आहे. आजवर जिल्ह्याचा विकास केवळ खुंटला आहे. यंदा जनतेचा कौल विकासाच्या दिशेने आहे. आपण सुरूवातीपासूनच विकासाचे व्हिजन मांडत आहोत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द असल्यामुळे विजय आपलाच असल्याचा दावा शेळकेंनी केला. तरुणाईचा ओढा आपल्याकडे आहे, जिल्ह्यात एमआयडीसी तयार करून तरुणांना रोजगार देण्याचे आपले प्रथम प्राधान्य आहे. शेतकऱ्यांसाठी नदीजोड प्रकल्प, सिंचनाची टक्केवारी, शेतपांदण रस्ते, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत. बचत गटांच्या भगिंनीसाठी ऑनलाइन बाजारपेठ खुली करण्याची आपली संकल्पना आहे. अश्या प्रकारे विविध बाबींवर आपण परिपूर्ण काम करण्यासाठी कटिबध्द आहोत. जनतेला विकास पाहिजे, आपला विजय निश्चितच आहे असे शेळके म्हणाले.